July 5, 2022

आचार्य चाणक्य यांच्या मृत्यू कसा झाला?

कितीही बिकट परिस्थिती आली तरीही आपल्या आंतरिक उर्मी च्या आधारे विश्‍वातील कोणत्याही शक्तिशाली विरोधकाला पराजित करण्याची नीती आपल्या चाणक्यनिती द्वारे संपूर्ण जगाला देणारे आचार्य चाणक्य हे आजही सत्तेच्या पटावर मोहरे क्षणात होत्याचे नव्हते करण्याच्या चालींची क्षमता असलेल्या व्यक्तीला कौतुकास्पद रीतीने दिले जाणारे बिरुद आहे.आचार्य चाणक्य यांचे संपूर्ण आयुष्य हे प्रचंड इच्छाशक्ती ने भारलेला प्रेरणादायी प्रवास आहे. एका सामान्य बालकाला चक्रवर्ती सम्राट बनवण्यामागे खरा केंद्र बिंदू असलेलेआचार्य चाणक्य यांचा मृत्यु आजही एक गूढ मानले जाते. आचार्य चाणक्य यांचा जन्म इसवी सन पूर्व 371 साली एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चणक आणि मातेचे नाव चंणेश्वरी देवी होते. चाणक्य यांच्या पित्याचा मृत्यू अकाली झाल्यामुळे त्यांचे पालन पोषण हे त्यांच्या मातेनेच केले. लहानपणापासूनच आचार्य चाणक्य जिद्दी व प्रचंड महत्वकांक्षी होते. चाणक्य यांच्या जन्मस्थानबद्दल अजून स्पष्ट अशी माहिती उपलब्ध झालेली नाही.काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म नेपाळच्या सरहद्दीवर झाला तर काही अभ्यासकांच्या मते चाणक्य यांचा जन्म दक्षिण भारतातील श्रवणबेळगोळ येथे झाला आहे. 

Loading...

चाणक्य हे निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही नावे म्हणजे चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त, अंगुल. यापैकी विष्णुगुप्त हे नाव  चाणक्य यांच्या पित्याने त्यांना दिले होते .तर अर्थशास्त्र या राजकीय अंगाने लिहिल्या गेलेल्या प्राचीन व अजरामर ग्रंथांमध्ये त्यांचे नाव चाणक्य असल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये ते चाणक्य या नावानेच ओळखले जातात. आचार्य चाणक्य हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता व प्रतिभा असलेले होते. त्यांनी नालंदा विश्वविद्यालय मधून आपले सामाजिक, राजकीय व समुद्र शास्त्र मधील अध्ययन पूर्ण केले व त्यानंतर काही काळ ते नालंदा विश्वविद्यालय मध्ये  ज्ञानदानाचे कार्य करत होते. 

Loading...

एका अध्यापका पासून प्रचंड मोठ्या साम्राज्याची सत्तेची घडी बसवणारा प्रशासक असे हे परिवर्तन चाणक्य यांच्यामध्ये होण्यामागे काही प्रमुख घटना कारणीभूत आहेत. मगधचा राजा घनानंद याने आचार्य चाणक्य यांच्या वडिलांवर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना मृत्युदंड दिला होता. त्यावेळी मगध हे एक मोठे साम्राज्य होते. मात्र मगधचा राजा घनानंद हा जनतेवर तीव्र अत्याचार करत असे व जनतेच्या करांवर जनतेच्या सुखसोयीं ऐवजी आपली वैयक्तिक मौजमजा व ऐषोरामाला प्राधान्य देत असे. त्या काळामध्ये संपूर्ण जग जिंकून घेण्याची इच्छा बाळगलेला सिकंदर भारतावर ही आपले साम्राज्य निर्माण करण्याची योजना आखत होता. सिकंदराचे हे स्वप्न पुर्ण न होऊ देण्यासाठी एक भरीव अशी योजना घेऊन आचार्य चाणक्य घनानंदाकडे गेले.मात्र आपल्या सत्तेच्या गर्वा मध्ये असलेल्या घनानंदाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व त्यांना त्यांचे ज्ञान देण्याचेच कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. 

Loading...

मात्र आपल्या राज्याच्या भल्यासाठी पुन्हा एकदा घनानंदाला समजावण्याचा प्रयत्न करत असताना  चाणक्य यांचा घनानंदाने घोर अपमान केला व त्यांना भरसभेत धक्का मारला त्या वेळी जमिनीवर पडलेल्या चाणक्य यांची शेंडी सुटली. त्यांनी अपमानाने क्रोधित होऊन अशी प्रतिज्ञा केली की जो पर्यंत संपूर्ण नंद वंशाचा ते विनाश करत नाही तोपर्यंत आपल्या शेंडीला गाठ बांधणार नाहीत .त्याप्रमाणे त्यांनी पुढील काळामध्ये संपूर्ण नंद वंशाचा विनाश करून भारतातील एक मोठे साम्राज्य स्थापन करण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली.

Loading...

चंद्रगुप्ताला एका सामान्य बालकापासून संपूर्ण भारतावर राज्य करणारा सम्राट हा प्रवास घडवून आणण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला युद्धनीती चे सर्व डावपेच शिकवले. उत्तम राज्यकर्ता होण्यासाठीच्या सर्व विद्या आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्ताला देऊ केल्या. चंद्रगुप्त व आचार्य चाणक्य यांनी मगधावर केलेला पहिला हल्ला हा मगधच्या अफाट सैन्य बळामुळे अयशस्वी ठरला. मात्र त्यानंतर आचार्य चाणक्य यांनी आपली कुशाग्र बुद्धिमत्ता व नीती कौशल्याचा वापर करून युद्धविषयक डावपेच बदलले. मगध सोडून अन्य बाहेरील देशांवर आक्रमण करण्याचे डाव पेच चाणक्याने आखले. विषकन्यांची फळी हे चाणक्याने शोधून काढलेले एक जहरी व जालीम औषध त्याकाळी मोठ्या प्रमाणात शत्रूवर चाल करण्यासाठी वापरले जात असे. विषकन्यांची फळी म्हणजे चाणक्यांनी या दलामध्ये सर्व सुंदर स्त्रियांचा किंवा कन्यांचा भरणा केला होता ज्यांना तो रोज थोड्या प्रमाणात विष देत असे जेणेकरून त्यांच्या शरीराला विषाची सवय व्हावी मात्र त्यांनी अन्य कोणत्याही व्यक्तीस चुंबन दिले तर त्याचा मृत्यू अटळ होता. मगधाच्या सैन्यदलापुढे चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे सेनाबळ कमी होते ही गोष्ट लक्षात घेऊन वात्सायन मुनींचा वेश धारण करून चाणक्याने चालत जाऊन भ्रमण करून लोकांना चंद्रगुप्ताच्या सैन्यात भरती होण्यास सांगितले व अशाप्रकारे त्याने चंद्रगुप्ताला जवळपास सात लाख पायदळ ,38 हजार घोडेस्वार व अन्य दलांमध्येही सैन्य  प्राप्त करून दिले. आचार्य चाणक्य यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे परिपूर्ण आकलन होते म्हणूनच मगधच्या शत्रु राष्ट्रांशी त्यांनी तह केले व अशा परिपूर्ण तयारीने जेव्हा मगधावर चंद्रगुप्त आणि आचार्य चाणक्य यांनी आक्रमण केले तेव्हा सत्तेच्या नशेत धुंद असलेला मगध चा राजा व नंद वंशाचा पूर्णपणे विनाश झाला व चाणक्य यांनी प्रतिज्ञाही पूर्ण केली. चंद्रगुप्त मगधचे चे राजा झाल्यानंतर आचार्य चाणक्यांनी राजा हा प्रजेच्या हिताला प्राधान्य देणारा असावा प्रजेच्या सुखात आपले सुख मानणारा असावा ही मुख्य नीती मांडली होती. व त्यानुसार जनतेच्या हितासाठी प्रशासनाचे मंत्रिमंडळ निर्माण केले या मंत्रिमंडळाचे प्रशासकीय विभाग, नागरी विभाग, गुप्तचर संस्था असे निरनिराळ्या विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. व्यापार विषयक, अर्थशास्त्रविषयक निर्णय घेणारे विभाग हे वेगळे होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रा मध्ये त्यावेळी चाणक्यांनी कोणत्याही राज्याच्या राजकीय नीती बद्दलची अनेक वचने मांडली आहेत जी जगभरामध्ये आजही प्रमाण मानली जातात.

Loading...

आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त यांना वेळोवेळी शत्रूच्या षडयंत्रापासून वाचवले. मात्र आचार्य चाणक्य यांचा स्वतःचा मृत्यू हे एक गूढ रहस्य आहे .आचार्य चाणक्य  यांचा मृत्यू कसा झाला याविषयी निराळी वर्णने तत्कालीन साहित्यामध्ये मिळतात.चंद्रगुप्त यांच्या मृत्यूनंतर बिंदुसार हे मगधच्या गादीवर बसले. चंद्रगुप्त प्रमाणेच बिंदुसार ही आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली मगधचा  राज्यकारभार कुशल रीतीने चालवत होते. मात्र आचार्य चाणक्य यांचा राजदरबारातील प्रभाव हा बिन्दुसार यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि काही मंत्र्यांना इर्ष्या उत्पन्न करणारा होता. म्हणूनच आचार्य चाणक्य व बिंदुसार यांच्यामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी निरनिराळे कट आखले जात होते. बिंदुसारच्या राजदरबारातील एक प्रधानमंत्री सुबंधु याने बिंदूसाराच्या मनात आचार्य चाणक्य हे बिंदूसाराच्या  मातेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे गैरसमज निर्माण केले.ज्यामुळे बिंदुसार याने आचार्य चाणक्य यांना भले बुरे सुनावले व त्यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाली. या प्रसंगानंतर दुखावलेले आचार्य चाणक्य हे मगध सोडून निघून गेले व त्यांनी अन्नपाणी त्याग करून आपल्या प्राणत्याग करण्याचे नियोजित केले. 

Loading...

आचार्य चाणक्य मगध सोडून गेल्यानंतर राजदरबारातील एका दाईने बिंदुसाराला  त्यांच्या मातेच्या मृत्यूच्या मागची खरी कहाणी सांगितली ज्या नुसार आचार्य चाणक्य चंद्रगुप्ताच्या अन्नामध्ये नेहमीच दररोज विषकन्यां प्रमाणेच थोड्याप्रमाणात विष मिसळत असत जेणेकरून चंद्रगुप्तांच्या शरीराला त्याची सवय व्हावी व त्यांच्यावर केला जाणारा कोणताही विषय प्रयोग सफल होऊ नये। मात्र एक दिवस नजरचुकीने चंद्रगुप्त साठीचे भोजन हे बिंदुसराच्या मातेने प्राशन केले जी त्यावेळी गर्भवती होती हे लक्षात येताच आचार्य चाणक्य यांनी राजवैद्यांच्या मदतीने गर्भातील मुलाचा प्राण वाचावा यासाठी प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांमध्ये बिंदुसरा च्या मातेचा मृत्यु झाला व जे मूल वाचले ते म्हणजेच बिंदुसार होय. ही सत्यकथा कळल्यावर बिंदुसार अत्यंत व्यथित झाले व आचार्य चाणक्य यांच्या शोधासाठी ते वास्तव्य करत असलेल्या जंगलात गेले व पुन्हा मगधला  येण्यासाठी त्यांनी आचार्य चाणक्य यांना विनवले .मात्र आपल्या निश्चयावर अढळ असलेल्या आचार्य चाणक्य यांनी मगध मध्ये पुन्हा येण्यास नकार दिला व अन्नपाण्याचा त्याग करून अंतिमतः त्यांचा मृत्यू ओढवला. अजून एका वर्णनानुसार आचार्य चाणक्य यांना बिंदुसराचा मंत्री सुबंधु याने जिवंत जाळले व त्या मध्येच त्यांचा प्राण गेला.

Loading...